16/03/2022 14:02:17 PM Sweta Mitra 33
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक तुर्तास लांबणीवर पडली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मराठीच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. याचेच प्रत्यंततर मंगळवारी रात्री मुंबईत आले. इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल स्पर्धेतील (IPL 2022) खेळाडुंसाठी परराज्यातून मागवलेल्या लक्झरी बसच्या मुद्द्यावरून मनसेने राडा घातला आहे. मनसे वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी काल रात्री ताज हॉटेलच्या परिसरात उभ्या असणाऱ्या लक्झरी बसेसची तोडफोड केली. येत्या २६ तारखेपासून मुंबईत आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक सामने हे महाराष्ट्रात खेळवले जाणार आहेत. या सामन्यांसाठी खेळाडूंना हॉटेलपासून मैदानापर्यंत नेण्यासाठी लक्झरी बसेस वापरण्यात येणार आहेत. परंतु, या बसेस गुजरात आणि दिल्लीहून मागवण्यात आल्या आहेत. आयपीएलचे सामने महाराष्ट्रात असूनही लक्झरी बसेस बाहेरून मागवल्याने राज्यातील वाहतूक व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला आहे. यावरच आक्षेप घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी बाहेरगावातून आणलेल्या या लक्झरी बसेसला विरोध केला आहे.