12/05/2022 17:02:27 PM Sweta Mitra 3
चीनच्या चाँगकिंग शहरात आज सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील विमानतळावर तिबेट एअरलाइनच्या विमानाला भीषण आग लागली. उड्डाण घेताना विमान घसरल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात ११३ प्रवासी आणि इतर नऊ कर्मचारी होते. आगीची माहिती मिळताच या सर्वांना विमानातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलं. मिळालेल्या माहितीनुसार, तिबेट एअरलाइनचे विमान चाँगकिंग शहरातून न्यिंगची येथे जात होते. मात्र उड्डाण घेताना रनवेवर विमान घसरले आणि आग लागली. विमानाने उड्डाण घेतलं नसल्याने प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. यामध्ये काही प्रवाशांना किरकोळ जखम झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विमानाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग नियंत्रणात आणण्यात आली.