21/05/2022 16:19:39 PM Sweta Mitra 105
जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपाॅक्स विषाणूच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होऊ लागली आहे. युरोपमधीलही अनेक देश या विषाणूच्या संसर्गामुळे हैराण झाले असून मंकीपॉक्सला जागतिक महामारी घोषित करण्याबाबत विचार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सावध झाले असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना एनआयव्ही आणि आयसीएमआरला दिल्या आहेत. मंकीपॉक्सचे रुग्ण आढळलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर लक्ष ठेवावे, प्रवासी आजारी असल्यास त्यांचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी एनआयव्हीला पाठवावेत, अशा सूचनाही आरोग्य मंत्री मांडविया यांनी दिल्या आहेत. ब्रिटेन, इटली, पोर्तुगाल, स्पेन, स्वीडन आणि अमेरिकेत या विषाणूचे रुग्ण आढळले आहेत. तसंच कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि फ्रांसमध्ये मंकीपॉक्स सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.