22/06/2022 18:45:45 PM Sweta Mitra 1
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्यामुळे शिवसेनेसह आघाडीतील मित्र पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. एकनाथ शिंदे यांनी काल रात्री उशीरा शक्तीप्रदर्शन केलं. एकनाथ शिंदे यांच्यासह ३६ आमदारांना सूरतमधून गुवाहाटीत हलवण्यात आलं होतं. आज एकनाथ शिंदे हे मुंबईत येऊन राज्यपालांची भेट घेणार आहे. त्यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे भेटीची वेळ मागितली आहे. सीआयएसएफ जवानांच्या सुरक्षेत ते राज्यापालांची भेट घेणार आहेत. दरम्यान, आसाम विमानतळावरती बोलताना शिंदे यांनी माझ्यासोबत ४० आमदार असून इतर १० आमदारांचा पाठिंबा देखील मिळणार असल्याचं सांगितलं आहे. शिवाय आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा देखील शिंदे यांनी केला आहे.