08/07/2022 18:31:24 PM Sweta Mitra 115
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे. जपानच्या नारा शहरात आबे यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या असून ते जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. जपान टाइम्सच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. नारा शहरात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असून भाषण देत असताना काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर ते खाली स्टेजवर कोसळले. त्यांच्या शरिरातून रक्तही येत होते. शिंजो आबे अचानक स्टेजवर कोसळल्याने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. शिंजो आबे यांची प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाहीये.
शिंजो आबे यांच्यावर गोळीबार केल्याच्या घटनेनंतरचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. आबे यांच्यावर केलेल्या हल्ल्यानंतर परिसरात एकच गोंधळ निर्माण झाला होता. तसंच, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. आबे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.