17/07/2022 19:14:33 PM Sweta Mitra 18
सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुने चीनच्या वांग झी यि हीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव केलाय. या कामगिरीसह पीव्ही सिंधू सुपर 500 विजेतेपदाची विजेती ठरलीय. पहिल्यांदाच पीव्ही सिंधूनं सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. या स्पर्धेनंतर सिंधू बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.
सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात तिसऱ्या मानांकित पीव्ही सिंधूनं वांगविरुद्ध पहिला सेट एकतर्फी जिंकला. त्यानंतर दुसरा सेट जिंकून वांगनं पुनरागमन केलं. मात्र, अखेरच्या सेटमध्ये पीव्ही सिंधूनं बाजी मारली. सिंगापूर ओपनचे सुपर 500 विजेतेपद पटकावून पीव्ही सिंधूनं कॉमेनवेल्थ गेम्सपूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पीव्ही सिंधूचं हे तिसरे पदक आहे. यावर्षी तिनं आशियाई चॅम्पियनशिपमध्ये प्रथम कांस्यपदक जिंकलं. त्यानंतर सय्यद मोदी इंटरनॅशनल आणि स्विस ओपनचे विजेतेपदही पटकावलं होतं.