31/07/2022 17:56:45 PM Sweta Mitra 4
1 ऑगस्टपासून देशात अनेक नवे नियम लागू होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. त्यामुळेच हे बदल जाणून घेणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे. जाणून घेऊया काही महत्त्वाच्या बाबी, ज्या 1 ऑगस्टपासून बदलणार आहेत.
चेकशी संबंधित नियम
बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. 1 ऑगस्ट 2022 पासून या बँकेने चेकसंबंधी नियम बदलले आहेत. या नव्या नियमानुसार 5 लाख रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू होणार आहे. यापुढे चेक क्लिअर होण्यापूर्वी एक ऑथेंटिकेशन प्रक्रिया पार पाडली जाईल. त्यानुसार चेक क्लिअर करतेवेळी बँकेकडून ग्राहकांना त्याबाबत विचारणा केली जाईल आणि खातरजमा केल्यावरच चेक क्लिअर केला जाईल.
स्वयंपाकाचा गॅस महागण्याची शक्यता
1 ऑगस्ट 2022 पासून एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांकडून घरगुती वापराच्या सिलिंडरसोबत व्यावसायिक वापराच्या गॅसचे दरही वाढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 16 जून रोजीच सिक्युरिटी डिपॉझिटमध्ये वाढ कऱण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे नवं गॅस कनेक्शन घेण्यासाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. आता 14.2 किलोच्या गॅस सिलिंडरचं कनेक्शन घेण्यासाठी 2200 रुपये मोजावे लागणार आहेत.