02/08/2022 18:42:36 PM Sweta Mitra 12
पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने उभारण्यात आलेल्या उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद भानगिरे यांनी स्वत:च्या खासगी निधीमधून उभारलेल्या या उद्यानाचे उद्घाटन आज पुणे दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार होते. मात्र अनेक स्वयंसेवी संस्थांनी याला विरोध केल्याने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.
पुण्यातील हडपसर भागात महापालिकेच्या जागेवर शिंदे यांच्या नावाने उद्यान उभे राहिले असून, त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार होते. मात्र या उद्यानाला शिंदे यांचं नाव देण्यास स्वयंसेवी संघटनांनी कडाडून विरोध केला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये दुपारच्या सुमारास या उद्यानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला. मात्र ऐनवेळी हा कार्यक्रम माजी स्थानिक नगरसेवक प्रमोद बानगिरे यांनी रद्द केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय.