13/01/2023 18:15:33 PM Sweta Mitra 5
राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत दिले. राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मध्यंतरी आझाद मैदानावर आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’वर बैठक झाली.
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं २ लाख २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नववर्षाची मोठी भेट दिली आहे. पोषण ट्रॅकर अॅपसाठी नवे मोबाइल दिले जाणार आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या मानधनातही १० टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यासंदर्भात २६ जानेवारीपर्यंत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला होता. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवार 12 जानेवारी रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावलं. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी ही बैठक झाली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारकडून नववर्षाची भेट दिली जाणार आहे. पोषण ट्रॅकर अॅपसाठी त्यांना नवे मोबाइल दिले जाणार आहेत. राज्य सरकार १४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांच्या मानधनातही वाढ केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली.