13/01/2023 18:20:06 PM Sweta Mitra 5
अभिनेत्री उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांतही उर्फीविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच, उर्फी जावेदवर महिला आयोग का कारवाई करत नाही? असा सवाल करत रुपाली चाकणकरांना चित्रा वाघ यांनी लक्ष्य केलं. त्यामुळे उर्फी जावेदमुळे रुपाली चाकणकर आणि चित्रा वाघ आमने-सामने आल्या आहेत. अशातच आज ( १३ ञानेवारी ) उर्फी जावेद रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उर्फी जावेद राज्य महिला आयोगाच्या कार्यालयात जाऊन रुपाली चाकणकर यांची भेट घेणार आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी सार्वजनिक ठिकाणी उर्फीला थोबाड फोडणार असल्याची धमकी दिली होती. त्याचप्रकरणी उर्फी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेट घेत मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
“उर्फी जावेद समोर आली तर तिचं थोबाड फोडणार आहे. पण, थोबाड फोडण्याआधी तिला साडी चोळीही देऊ. त्यानंतरही तिनं नंगानाच सुरु ठेवला तर तिचं थोबाड फोडणार,” अशी आक्रमक भूमिका चित्रा वाघ यांनी घेतली होती.