19/01/2023 17:24:13 PM Sweta Mitra 0
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस त्यांच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आहेत. अमृता यांचं “आज मैं मूड बना लिया” हे गाणं काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. या गाण्यात त्यांच्या नृत्याची झलकही पाहायला मिळाली. अमृता यांच्या नव्या गाण्याला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली. काही तासांतच त्यांच्या नव्या गाण्याला लाखोंमध्ये व्ह्यूज मिळाले.
अमृता यांनी “आज मैं मूड बना लिया” गाण्यावर रील स्टार रियाझ अली याच्याबरोबर व्हिडीओ बनवला आहे. रियाझ अलीसह या व्हिडीओमध्ये त्या गाण्याची हूक स्टेप करत डान्स करताना दिसत आहेत. अमृता यांचा रियाझ अलीबरोबरचा हा रील व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी अमृता फडणवीसांना ट्रोल करत आहेत. आता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळे यांनी अमृता फडणवीसांच्या या रीलवर आक्षेप घेतला आहे.
त्यांनी अमृता फडणवीसांच्या या रीलबाबत भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन रीयाझ अलीबरोबरचा एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. तो रील व्हिडीओ सरकारी बंगल्यात शूट करण्यात आला आहे. अमृता फडणवीसांनी सरकारी बंगल्यात रील बनवण्यासाठी सरकारकडून लेखी अधिकृत परवानगी घेतली होती का? हेदेखील त्यांनी रीलप्रमाणे व्हायरल करावं”.