20/01/2023 18:07:55 PM Sweta Mitra 1
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात जुळ्या मुलींच्या जन्मानंतर निराश होऊन एका पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयात मुलींची माहिती मिळताच तो औषधे आणायला जायचे असे सांगून निघून गेला आणि परत आलाच नाही. त्याचा मृतदेह नदीत सापडला. वासुदेव पटले असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.
बालाघाट जिल्ह्यातील धुनी गावात राहणारा वासुदेव पटले (वय 35) हा शेतकरी शेतीबरोबरच खाजगी काम करायचा. तरुणाला दोन मुली असून त्याची पत्नी मीना हिने बुधवारी बालाघाट जिल्हा रुग्णालयात पुन्हा जुळ्या मुलींना जन्म दिला. जुळ्या मुलींच्या जन्मामुळे तरुण संतापला होता. हा तरुण आपल्या एका नातेवाईकाला औषधे आणण्यास सांगून रुग्णालयातून निघून गेला होता.
सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा तरुण परतला नाही, त्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. जुळ्या मुलींचा जन्म झाल्याने नातेवाईक गुरुवारी सकाळी पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी वासुदेव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान सदर वर्णनातील व्यक्तीने वैनगंगा नदीत उडी मारल्याचे निष्पन्न झाले.