20/01/2023 18:12:35 PM Sweta Mitra 0
शिवसेनचं धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरेंना मिळणार की शिंदेंना मिळणार? महाराष्ट्राला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आज (20 जानेवारी) मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज दुपारी चार वाजता याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह तात्पुरतं गोठवलं आणि ठाकरेंना मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिलं. त्यानंतर धनुष्यबाण या शिवसेनेच्या मूळ चिन्हावर दोन्ही गटांनी दावा केला आहे. दरम्यान, संघटनात्मक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तसेच पक्षाचे सदस्य आणि इतरही माहिती ठाकरे आणि शिंदे गटाला दिली आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या 23 जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आजची सुनावणी दोन्ही गटांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ 23 जानेवारी 2023 रोजी संपत आहे. पुन्हा निवडीसाठी परवानगी द्या किंवा हा कायदेशीर पेच संपेपर्यंत मुदतवाढ द्या अशी मागणी ठाकरे गटाने आयोगात केली होती. निवडणूक आयोगाने संघटनात्मक निवडणुकांना परवानगी दिली तर याचा अर्थ शिवसेनेच्या घटनेनुसार ठाकरे गटाचं अस्तित्व मान्य केल्यासारखं होतं. त्यामुळे एकतर मुदतवाढ किंवा त्याआधीच काही मोठा निर्णय या दोन शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.