20/01/2023 18:17:03 PM Sweta Mitra 0
गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपामध्ये पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये छुपे मतभेद असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहेत. देवेंद्र फडणवीसांमुळेच पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणातून बाहेर काढून राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आलं, असेही दावे केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये नेमकं काय चाललंय? यावरून तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस ज्या कार्यक्रमांना उपस्थित राहतात, त्या कार्यक्रमांना पंकजा मुंडे नसतात, अशी कुजबुज सुरू झाली आहे. त्यावर पत्रकारांनी आज पंकजा मुंडेंना विचारणा केली असता त्यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर पंकजा मुंडेंना राज्याच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका मिळण्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, चर्चा हवेतच विरल्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा नाराज असल्याचं बोललं जात आहे. खुद्द पंकजा मुंडे यांनीही २०१९मध्ये राज्यातील सत्तास्थापनेच्या गोंधळादरम्यान आपली नाराजी बोलून दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंच्या मनात खदखद आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
शिक्षक मतदारसंघातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह प्रचारात उतरल्या आहेत. यावेळी माध्यमांशी चर्चा करताना या मुद्द्यावर पंकजा मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पंकजा मुंडेंचा भाजपामध्ये अपमान होत असून त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांचा सन्मान करू, अशी खुली ऑफर ठाकरे गटाकडून देण्यात आल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता आपल्या मनात कोणतीही खदखद नसल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.