24/01/2023 17:41:21 PM Sweta Mitra 7
अखेर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीत चौथा भिडू मिळाला आहे. वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे. याशिवाय या नव्या युतीचे राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या दूरगामी परिणाम होणार आहेत.
यावेळी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी युती संदर्भातील प्रास्ताविक केलं. यावेळी संजय राऊतहेही उपस्थित होते. ज्या स्वप्नाची महाराष्ट्राची जनता वाट पाहत होते. यापूर्वी असा प्रयोग झाला. पण प्रकाश आंबेडकर आणि आम्ही पहिल्यांदाच एकत्र आलो आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. आमचे आजोबा एकमेकांचे समकालीन आणि एकमेकांचे सहकारी होते. दोघांनीही त्या काळातील वाईट प्रथांवर प्रहार केले. आताही राजकारणात वाईट प्रघात सुरू आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत. देश प्रथम हा मुद्दा महत्त्वाचा घेऊनच आम्ही एकत्र आलो आहोत, असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
परंपरा आणि चाली चाललेल्या आहेत त्या मोडून तोडून टाकण्यासाठी या दोन्ही पिढ्यांचे वारसदार आमच्यासोबतचे जे सहकारी आहेत. ते एकत्र येऊन काम करणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.