11/03/2023 17:37:45 PM Sweta Mitra 13
OYO चे संस्थापक रितेश अग्रवाल यांचे वडील रमेश अग्रवाल यांचे शुक्रवारी निधन झाले. रिपोर्टनुसार, गुरुग्राममध्ये एका टोलेजंग इमारतीच्या २० व्या मजल्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. ओयोच्या प्रवक्त्यानं रितेश अग्रवाल यांच्या वडिलांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
गुरुग्राम पोलिसांच्या माहितीनुसार, या घटनेची माहिती जवळपास १ वाजता मिळाली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. रमेश अग्रवाल यांचा मृत्यू २० व्या मजल्यावरून पडून झाल्याचे समोर आले. ते डीएलएफ क्रिस्टा सोसायटीत राहत होते. ते आपल्या घराच्या बाल्कनीतून पडले. त्यात जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.
पोलिसांच्या माहितीनुसार, घटना घडली त्यावेळी घरात इतरही मंडळी होती. तीन दिवसांपूर्वीच रितेश अग्रवाल यांचा विवाह झाला होता. लग्नाच्या तीन दिवसांनंतर ही दुर्दैवी घटना घडली आहे.
रितेश अग्रवाल म्हणाले की, आमचे मार्गदर्शक आणि प्रेरणा असलेले आमचे वडील रमेश अग्रवाल यांचे १० मार्च रोजी निधन झाले. त्यांचे निधन ही आमच्या कुटुंबीयांसाठी मोठी हानी आहे. त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द आमच्या हृदयात राहील.