17/03/2023 16:52:54 PM Sweta Mitra 14
सर्व महिलांना आजपासून एसटी प्रवासात 50 टक्के सवलत मिळणार आहे. तसा राज्य सरकारचा शासन अध्यादेश जारी झाला आहे. त्यामुळे आजपासून महिलांना 50 टक्के सवलत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थसंकल्प 2023मध्ये महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.
राज्य सरकारचा जीआर निघाल्याने आजपासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांच्या तिकीट दरात 50 टक्के सवलत देण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेला एसटी महामंडळाच्या स्तरावर 'महिला सन्मान योजना' म्हणून ओळखले जाईल. या योजनेची प्रतिपूर्ती रक्कम शासनाकडून महामंडळाला मिळणारे आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या यात साधी, मिडी, मिनी, निमआराम, विनावातानुकुलीत शयन-आसनी, शिवशाही (आसनी), शिवसेनेरी, शिवाई (साधी आणि वातानुकुलीत) या बसमध्ये आजपासून 50 टक्के सवलत लागू करण्यात आली आहे. तसेच यापुढे ज्या नवीन गाड्या उपलब्ध होतील, त्यामध्ये ही सवलत मिळणार आहे.
तसेच जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेद्वारे आरक्षण करतील, मोबाईल अॅपमाध्यमातून तिकीट घेतील त्यांच्याकडून सेवा प्रकार निहाय लागू असलेला आरक्षण आकार वसूल करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचवेळी मात्र, ज्या महिलांनी आधी तिकीट आरक्षण केले आहे. त्यांना याचा लाभ मिळणार नाही, असे शासन आदेशात स्पष्ट नमुद करण्यात आले आहे.