18/03/2023 17:33:14 PM Sweta Mitra 20
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मराठवाड्याला पुन्हा एकदा आता अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मराठवाडा विभागातील सर्वच जिल्ह्यात कमी अधिक पावसाचा फटका बसला आहे. तर काही ठिकाणी अक्षरशः गारपीट पाहायला मिळाली. दरम्यान मराठवाड्यात 6 ते 8 आणि 14 ते 17 मार्च या काळात झालेल्या अवकाळी पावसामुळे आठ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत या काळात पाच मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे विभागात 21 जनावरांचा जीव गेला आहे. वीज कोसळून हिंगोलीत एक, तर परभणीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अवकाळी पावसामुळे 22 नागरिक जखमी झाले आहेत. तर 8 मार्च रोजीच्या अहवालानुसार जिरायत एक हजार हेक्टर, बागायत दोन हजार 55 हेक्टर, तर 17 हेक्टरवरील फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच 14 ते 17 मार्च दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे 152 हेक्टर, तर नांदेडमध्ये सर्वाधिक 4 हजार 794 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
अवकाळी पावसाचा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला देखील बसला आहे. शुक्रवारी (17 मार्च) जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. सोयगाव तालुक्यात अक्षरशः गारपीट पाहायला मिळाली. त्यामुळे केळी, गव्हासह इतर पीकांचे नुकसान झाले आहे. तर अजिंठा लेणी परिसरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसाचा फटका लातूर जिल्ह्याला देखील बसला आहे. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अनेक गावात अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.
या पावसामुळे काढणीला आलेला ज्वारी, गहू, हरभरा, करडी यासारख्या पिकांना फटका बसला आहे. ज्यांनी काढणी करुन ठेवली आहे त्यांनी रास घरी नेली नाही. त्यांना देखील पावसाचा फटका बसला आहे. तर पावसामुळे काही दिवसात होणारी काढणी आता लांबली आहे. विशेष म्हणजे याचा उत्पन्नावरही परिणाम होणार आहे. तसेच आंब्याच्या बागेला या पावसाचा फटका बसला आहे.